महिला दिन विशेष लेख-आवाज जामखेडचा

आजच्या घडीला महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत घरातील सर्व कामे असतील नोकरीच्या ठिकाणची का,मे असतील यामध्ये महिला गुंतलेल्या दिसून येत आहेत.

आणि अशा व्यग्र जीवनशैलीमध्ये महिलांच्या शरीरावर आणि मनावर सतत तान वाढताना दिसत आहे. आणि हा सातत्याने वाढत जाणारा ताण त्यांना अनेक आजारांकडे व्याधींकडे घेऊन जात असतो आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांचे आरोग्य चांगले राहत नाही.

अशा परिस्थितीमध्ये महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे याकरिता महिलांनी आहार, विहार, निद्रा यांचे नियमन करणे अतिशय महत्त्वाचे असते. मग त्यामधे आहारामध्ये वेळेवर चांगल्या दर्जाचा प्रथिने, कर्बोदके आणि जीवन सत्वानुरूप कमी उष्मांकाचा शरीरास उपयुक्त असा सकस आहार घ्यायला पाहिजे.

आहाराबरोबरच भरपूर प्रमाणात पाणी पिणे तेवढेच महत्त्वाचे आहे त्यानंतर विहारामध्ये आपल्या भारतीय परंपरेनुसार चालत आलेल्या व ऋषीमुनींनी निर्माण करून ठेवलेल्या योग विद्येचा अभ्यास करणे अतिशय लाभकारक आहे. योग अभ्यासाने महिलांच्या शरीरावरील आणि मनावरील ताण कमी होऊन निरामयता प्राप्त होऊ शकते.

परंतु हे त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये अंगीकारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर व्यायाम जसे की चालणे, पळणे, पोहणे, तालबद्ध झुंबा करणे, एरोबिक करणे व सायकलिंग करणे इ.. आणि शेवटचे म्हणजे निद्रा आजच्या दैनंदिनीमध्ये प्रत्येक व्यक्तीची विश्रांती कमी होत चालली आहे. याचे कारण म्हणजे व्यक्तीला असणाऱ्या चुकीच्या सवयी यामध्ये मग सतत मोबाईलचा अतिरिक्त वापर करणे. जास्त वेळ टीव्ही पाहणे.

ही मनोरंजनाची उपकरणे व्यक्तीच्या विश्रांतीच्या काळाला कमी करायला लागली आहेत आणि त्यामुळे महिलांच्याही झोपेच्या वेळा पुढे ढकललेल्या आहेत. आणि याचा परिणाम म्हणजे पचनक्रिया मंदावणे, अपचन होणे, बद्धकोष्ठता होणे आणि डोळ्यांचे प्रॉब्लेम अशा नानाविध परिणाम न झोपण्यामुळे होत आहेत.

त्यामुळे महिलांनी वेळेवर झोपून लवकर उठले पाहिजे व योगअभ्यास केला पाहिजे किंवा इतर शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. ही महिलांच्या सुखी जीवनासाठी काळाची गरज आहे असे म्हणता येईल.

प्रा.राजू म्हेत्रे
शारीरिक शिक्षण संचालक, श्री संत गजानन महाविद्यालय, खर्डा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *