*महिला सक्षमीकरणासाठी कायदा महिलांच्या पाठीशी- प्रथम वर्ग न्यायाधीश वैभव जोशी*

जामखेड प्रतिनिधी,

कायद्यापुढे सर्व नागरिक समान असून स्त्री-पुरुष भेदभाव केला जात नाही. महिला सक्षमीकरणासाठी कायदा महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे प्रतिपादन जामखेड तालुका प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश वैभव जोशी यांनी केले. ते महिला दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांनी आयोजित केलेल्या शिबिरात बोलत होते.

श्री. जोशी पुढे म्हणाले की कायद्याने सर्व महिला पुरुष समान असून समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे. स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नसून आज आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत.

यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की महिला हा वंचित घटक मानून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मागील अडीच वर्षापासून प्रयत्न करत आहे. सिंचन विहीर, घरकुल तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद सेस फंडातील योजनांमध्ये महिलांना विशेषता विधवा एकल महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला तसेच कोरोना काळामध्ये विधवा झालेल्या महिलांना सिंचन विहिरीचा लाभ मोठ्या प्रमाणात पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना, कर्ज उपलब्ध करून देऊन महिला सक्षमीकरणासाठी पंचायत समिती सातत्याने प्रयत्न करत आहे.

यावेळी ऍड. नागरगोजे, ग्रामसेविका श्रीमती पटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांचा पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार न्यायाधीश वैभव जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ऍड. नितीन घुमरे, ऍड. अल्ताफ शेख, ऍड. एम आर कारंडे, विस्ताराधिकारी गायकवाड, अधीक्षक चौसाळकर, अनिल चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामसेवक श्री प्रशांत सातपुते यांनी केले तर विस्तार अधिकारी श्री बीके माने यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तालुक्यातील वकील, पत्रकार तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *