*जामखेड शहरात आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन; हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला दिमाखदार सोहळा*
*कळंबोली येथील जय श्रीराम बाल गोविंदा पथकाने कोरले बक्षीसावर आपले नाव*
जामखेड | जामखेड शहरात नुकताच मोठ्या उत्साहात व जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. आमदार रोहित पवार मित्र मंडळ व कर्जत जामखेड तालुक्यातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. हजारोंच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावर पार पडला. अत्यंत उत्साहात जय श्रीराम बाल गोविंदा पथक या मंडळाने यंदाची नागेश विद्यालयाच्या मैदानावर असलेली हंडी फोडून बक्षिसावर आपलं नाव कोरलं.
विजयी झालेल्या कळंबोली (पनवेल) येथील मंडळाला १ लाख ११ हजार १११ रुपये रोख बक्षीस म्हणुन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच अशाच पद्धतीने मतदारसंघातील मुला मुलींसाठी देखील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनाही आमदार रोहित पवार यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
गतवर्षीही आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून भव्य दही हंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी मात्र नागरिक, स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार रोहित पवार मित्र मंडळ यांनी मिळून भव्य दही हंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. हजारोंच्या संख्येनं परिसरातील नागरिक, महिला, अबालवृद्ध असे सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
अशाच पद्धतीच्या दहीहंडी स्पर्धेचे कर्जत शहरातही यंदा आयोजन करण्यात आले असून दिनांक १२ सप्टेंबर रोजी कर्जत शहरात अशाच पद्धतीने भव्य दही हंडी स्पर्धा पार पडणार आहे. आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस हा २९ सप्टेंबर रोजी आहे त्याच पार्श्वभूमीवर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन येत्या काही दिवसात करण्यात आले आहे. त्यातच हा भव्य दही हंडी उत्सव मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडल्याने सर्वत्र याच सोहळ्याची चर्चा पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे महिला आणि मुलींची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले कारण महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली होती.