*निरव मोदी व पाटेगाव ग्रामपंचायतच्या ठरावामुळे कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द, 15 दिवसांत नव्या जागेचा प्रस्ताव दाखल करा – उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश*

कर्जत-जामखेड : निरव मोदीमुळे वादग्रस्त ठरलेल्या तसेच पाटेगाव ग्रामपंचायतने विरोध दर्शवल्यामुळे कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्याचा मोठा निर्णय नागपुर विधानभवनात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

येत्या 15 दिवसांत कर्जत एमआयडीसीसाठी नवीन जागेचा शोध घेऊन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावा असे स्पष्ट निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभाग व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.

कर्जत एमआयडीसीबाबत मंगळवारी (12 डिसेंबर रोजी) दुपारी नागपूर येथील विधानभवनातील उद्योगमंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडली. कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या भागात एमआयडीसी निर्मितीचा घाट आमदार रोहित पवार यांनी घातला होता. परंतू सदर एमआयडीसीच्या क्षेत्रात निरव मोदीची जमिन असल्याची बाब आमदार प्रा.राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. या गंभीर प्रकाराची सरकारने तातडीने दखल घेत चौकशी सुरु केली होती.

यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे ज्या गावात ही एमआयडीसी होणार होती त्या पाटेगाव ग्रामपंचायतने सदर एमआयडीसी विरोध करत तसा ग्रामसभेचा ठरावही शासनाला सादर केला होता. यामुळे पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांच्या हाती रोजगार मिळावा यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी सन 2015-2016 सालापासून कर्जत एमआयडीसीसाठी प्रयत्न सुरु केले होते. महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून कर्जत एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी आमदार शिंदे यांनी कंबर कसली आहे. मागील पावसाळी अधिवेशनात कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर त्यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 97 अन्वये विधानपरिषदेत चर्चा घडवून आणली होती. त्यानुसार सरकारकडून चौकशी सुरु होती.

दरम्यान, सध्या उपराजधानी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात कर्जत एमआयडीसीबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी आपल्या दालनात कर्जत एमआयडीसीबाबत बैठक घेतली. या बैठकीला आमदार प्रा.राम शिंदे यांच्यासह उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वादग्रस्त पाटेगाव- खंडाळा एमआयडीसी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपुर येथे पार पडलेल्या बैठकीबाबत बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, कर्जत येथील नियोजित एमआयडीसी बाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली बैठकीमध्ये निर्णय झाला की पाटेगाव ग्रामपंचायतीने विरोध केला असल्याने त्याचबरोबर देशाला फसवलेल्या भगोडा निरव मोदीची जमीन असल्यामुळे सदरील प्रस्तावित एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योगधंदे आले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कर्जत तालुक्यातील इतर जमीन (नियम,अटी व शर्तीला पुर्ण करणारी ) एमआयडीसीसाठी लागणाऱ्या जमिनीचा परिपूर्ण प्रस्ताव 15 दिवसाच्या आत तयार करून शासनाला सादर करावा असे स्पष्ट निर्देश दिले आपल्याला युवकांना , सुशिक्षित बेरोजगाराला काम देण्यासाठी एमआयडीसी मंजूर करणे गरजेचे आहे असे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीमध्ये दिले, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.

चौकट

कर्जत तालुक्यात युवकांना काम देण्यासाठी एमआयडीसी व्हावी यासाठी मी 2015-16 पासून प्रयत्नशील आहे. पाटेगाव-खंडाळा भागात होणाऱ्या एमआयडीसीच्या जागेत निरव मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनी असल्याची बाब मी पावसाळी अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली. चौकशी केली. देशाला फसवणाऱ्या निरव मोदीची जागा असल्याची बाब स्पष्ट झाली. तसेच पाटेगाव ग्रामपंचायतनेही एमआयडीसीला विरोध करत ग्रामसभेचा ठराव केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नागपुरच्या बैठकीत पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढिल 15 दिवसांत नवीन जागेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योग विभाग व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्जत तालुक्यातील तरूणांना रोजगार मिळावा यासाठी महायुती सरकारच्याच काळात एमआयडीसी मंजुरीचा निर्णय होईल यात तिळमात्र शंका नाही.
*- आमदार प्रा.राम शिंदे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *