**जामखेडमध्ये पाण्याचा ठणठणाट, महाविकास आघाडीचा नगरपरिषदेवर हंडा मोर्चा!*
*प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी.*
*जामखेड ता 28:*
जामखेड शहरात आतापासूनच पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून, नागरिकांना १० ते १२ दिवसांनी पाणी मिळत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असून, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासह महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षाच्या वतीने जामखेड नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला भगिनी हातात हंडे घेऊन मोर्चात सहभागी झाल्या. पाण्याच्या प्रश्नावर महिला आक्रमक झाल्या असून, त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. शहरात दर ५ ते ६ दिवसांनी पाणीपुरवठा करावा आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
जामखेड शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी दहीगाव ते जामखेड पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. या योजनेत शहरातील सात वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. मात्र, योजनेचे काम पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा निश्चित करून पुढील कामे लवकर पूर्ण करावीत, संबंधित विभागांची बैठक घेऊन काम पूर्ण करण्याची कालमर्यादा ठरवावी आणि केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सध्या राज्यभर दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होत असताना जामखेडमध्येही पाण्याची टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. अजून हिवाळा आणि उन्हाळ्याचा मोठा कालावधी बाकी आहे. त्यामुळे आताच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही, तर पुढील काळात जामखेडकरांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागेल आणि पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या मोर्चावेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शहाजी राळेभात, युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, माजी नगराध्यक्ष श्री. निखिल घायतडक, नगरसेवक वसीम सय्यद, नगरसेवक राजेंद्र गोरे, नगरसेविका प्रीती प्रशांत राळेभात, नगरसेविका हिना इस्माईल सय्यद, नगरसेविका मेहरुणीसा शफी कुरेशी, शिवसेना (उ. बा. ठा.) तालुकाध्यक्ष ॲड. मयुर डोके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. कुंडल राळेभात, आपचे तालुकाध्यक्ष श्री. संतोष नवलाखा, प्रहारचे तालुकाध्यक्ष श्री. नयुम सभेदार, पोले नाना, कल्लू चाचा, रमेश आजबे, मंगेश आजबे, अर्चना संपत राळेभात, अनुराधा अडाले, बजरंग डूचे, माजीत कुरेशी, मनोज राळेभात, प्रकाश काळे, शरद शिंदे, महेंद्र राळेभात, रामहरी गोपाळघरे, दादाराजे भोसले, बिभिषण परकड, कांतिलाल वाळूजकर, अमर चाऊस, रावसाहेब जाधव, वसीम शेख, हरिभाऊ आजबे, संदीप गायकवाड, अण्णा मोरे, संदीप अडाले आणि दादा महाडिक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. जामखेडकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच जागे होऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, नियमित पाणीपुरवठा सुरू करावा आणि दहीगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
![]()
