सिताराम बाबांनी खर्डा व परिसराला वैभव प्राप्त करून दिले – ह.भ.प. महालिंग महाराज नगरे.
आ. रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता, हजारो भाविकांची उपस्थिती..
जामखेड प्रतिनिधी,
वै. सिद्ध संत सिताराम बाबा हे अनेक वर्ष खर्डा व परिसरात वास्तव्यास होते त्यांच्या पदस्पर्शाने अनेक मंदिरांचा कायापालट झाला असून त्यांनी खर्डा व परिसराला वैभव प्राप्त करून देण्याचे काम केले, असे उद्गार ह.भ.प. महालिंग महाराज नगरे यांनी व्यक्त केले.
यावेळी ह.भ. प. रंधवे बापू महाराज ह. भ. प. गीते महाराज आमदार रोहित दादा पवार,सरपंच सौ.संजीवनी वैजीनाथ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, युवराज आबा गोलेकर, माजी सरपंच संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, श्रीकांत लोखंडे, चंद्रकांत गोलेकर, हरी गोलेकर, महादेव ढगे, अक्षय गोलेकर, मच्छिंद्र गीते, ज्ञानेश्वर नगरे पत्रकार दत्तराज पवार इत्यादी उपस्थित होते.
ते बोलताना पुढे म्हणाले की आजपर्यंत सर्वांच्या आशीर्वादाने सिताराम गडा गडाला वैभव प्राप्त झाले आहे. माजी मंत्री आ. राम शिंदे व आमदार रोहित दादा पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी गडासाठी उपलब्ध केला आहे. या ठिकाणी लवकरच भव्य सभा मंडप उभारण्याचे काम सुरू होणार आहे त्यासाठी जमलेल्या प्रत्येक घरातील व्यक्तीने मदत करावी असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार रोहित दादा पवार यांनी अकरा लाख रुपयांची देणगी जाहीर केली यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला, त्याचबरोबर अनेकांनी आपआपल्या परीने देणगीच्या रकमा यावेळी जाहीर केल्या. या सर्वांचे आभार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज नगरे यांनी आभार मानले.
यावेळी ह.भ.प.रंधवे बापू महाराज म्हणाले की, संत व नेते हे समाज जागृतीचे दोन चाके आहेत नेत्यांनी जगवायचे काम करायचे असते, तर संतांनी जागवण्याचे काम करावे लागते. येथील सभामंडपाचे पुढील वर्षापूर्वी काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार रोहित दादा पवार बोलताना म्हणाले की,सिताराम गडाला पुढील काळात तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून येथे भाविकांना दर्शनासाठी सुख सोयी उपलब्ध होणार आहेत तसेच श्री संत गीते बाबा देवस्थानच्या कामासाठी सहा कोटी 50 लाख रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असून त्याचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्याचबरोबर येथील सभामंडप बांधकामासाठी 11 लाख रुपयांची देणगी त्यांनी यावेळी जाहीर केली, तसेच आजपर्यंत मी सिताराम गडासाठी जे जे काम केले आहे ते काम सिताराम बाबांनी माझ्याकडून करून घेतले असल्याचे आ. पवार यांनी सांगितले.
यावेळी खर्डा व परिसरात ती गुणवंत विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या माध्यमातून यशस्वी पदार्पण केले त्या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. काल्याची दहीहंडी महालिंग महाराज नगरे, ह.भ.प. रंधवे बापू महाराज व आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते फोडण्यात आली.
याप्रसंगी अ.नगर, बीड,धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातून व खर्डा परिसरातील लाखो भावी भक्त कार्यक्रमास उपस्थित होते, त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होऊन सर्वांनी काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. सरपंच राम दादा भोसले, बाळासाहेब गोलेकर, उद्धव ढेरे खर्डा येथील बहुसंख्य तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.