बीड-

आष्टी तालुक्यातील कडा बाजार समिती बिनविरोध करण्यात आमदार सुरेश धस यांनी यश मिळविले आहे. बाजार समितीच्या एकूण १८ जागांपैकी १२ जागा आपल्या पदरात पाडून घेत आमदार धस यांनी बाजार समितीवर आपले पुन्हा वर्चस्व राखले आहे.

दरम्यान, कडा बाजार समिती आमदार सुरेश धस गट आणि भाजपला (BJP) १२ जागा देण्यात आलेल्या आहेत. माजी आमदार भीमराव धोंडे गटाला ३, तर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार बाळासाहेब आजबे यांना ३ जागा मिळाल्या आहेत.

 

धस म्हणाले की, या संचालक मंडळाच्या माध्यमातून सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मतदार संघात सर्व समाज घटकांना समान न्याय या माध्यमातून आम्ही दिलेला आहे. कडा मार्केट कमिटीच्या माध्यमातून आजवर आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा व योग्य निर्णय घेत, शेतकरी व व्यापारी यांच्यातील दुवा जोडत, या मार्केटची भरभराटी करण्याचा प्रयत्न केला आहे.

बाजार समितीच्या १८ जागांसाठी ५८ अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यातच आमदार धस यांनी पुढाकार घेत सर्वांशी चर्चा केली.

त्यात बाजार समिती बिनविरोध करण्यावर राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे, आमदार धस, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर यांच्यामध्ये एकमत झाले आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळींमध्ये एकमत झाल्यानंतर अर्ज भरलेल्या इतरांनाही विनंती करण्यात आली, त्यामुळे बाजार समितीच्या १८ जागांसाठी अठराच अर्ज शिल्लक राहिल्याने ही बाजार समिती बिनविरोध झाली.

त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे धस गटाला १२ जागा देण्यात आलेल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीला तीन, तर माजी आमदार धोंडे गटाला तीन जागा देण्यात आलेल्या आहेत. तशी घोषणा आमदार धस यांनी केली. कडा बाजार समितीवर आपले वर्चस्व राहील, याची काळजीही धस यांनी बिनविरोध करताना घेतल्याचे दिसून येते. कारण, संचालक मंडळात आमदार धस यांच्या पॅनेलच बहुमत असणार आहे.

सर्वांशी विचारविनिमय करून ही बाजार समितीची निवडणूक आम्ही बिनविरोध केली. बाजार समित्यांना निवडणुकीचा खर्च परवडत नाही. तसेच, विनाकारण मतभेद वाढावायचे नको; म्हणून ही निवडणूक बिनविरोध केलेली आहे, असेही आमदार सुरेश धस यांनी बिनविरोध निवडीनंतर बोलताना स्पष्ट केले.

आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, तसेच ज्या कार्यकर्त्यांनी आपले निवडणूक अर्ज माघारी घेऊन सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो, असेही धस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *