*आष्टी ते नगरकडे जाणाऱ्या रेल्वेला आग, गाडीचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवीत हानी नाही*
जामखेड प्रतिनिधी,
नवीन आष्टी स्टेशनकडुन नगरकडे जाणाऱ्या रेल्वेला वाळुंज शिवारातील नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी आज दि. १६ रोजी भीषण आग लागून गाडीचे ६ डबे भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. रेल्वेमध्ये ५-६ प्रवासी होते, आग लागल्याचे समजताच त्यांनीही पटापट बाहेर उड्या टाकल्याने सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर रेल्वे वाहतूक सुरू झालेली आहे. सोमवारी दुपारी आष्टीकडून नगरकडे येत असलेली रेल्वेगाडी नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी आली असता. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच आतील प्रवाश्यांनी गाडीच्या खाली
पटापट उड्या टाकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार उपस्थितांपैकी तातडीने रेल्वे पोलिस तसेच नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच नगर-सोलापूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून टँकरची व्यवस्था करण्याची विनंती केली. काही वेळात अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी पोहचले, मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत रेल्वेगाडीचे सहा डबे भस्मसात झाले असल्याचे सांगण्यात आले. आगीचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नव्हते.