*सिंचन विहिरींचे काम सुरू न केल्यास सहा महिन्यात आपोआप रद्द होणार-*

जामखेड प्रतिनिधी,

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सिंचन विहिरीसाठी शासनाकडून चार लाख रुपयांचे अनुदान पात्र लाभार्थ्यांना दिले जाते. जामखेड तालुक्यात चालू वर्षी 1123 लाभार्थ्यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आली आहे. या विहिरींचे काम 6 महिन्यात सुरू करण्याची शासनाची अट आहे. तसेच एकदा काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षात काम पूर्ण करावे लागते यासाठी लाभार्थ्यांना चार लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. लाभार्थ्यांनी कमी वेळेत काम पूर्ण केले तर त्या ग्रामपंचायतला पुढील लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ मंजूर करता येतो. परंतु अनेक लाभार्थ्यांनी एकाच वेळी विहिरींचा लाभ मंजूर करून जर विहिरींचे कामकाज सुरू केले नाही तर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांची विहीर रद्द होते.

अशा लाभार्थ्यांना पुन्हा विहिरीचा लाभ देणे शक्य होत नाही. त्यामुळे विहीर रद्द होऊ नये असे वाटत असेल तर लाभार्थ्यांनी तात्काळ विहिरीचे काम सुरू करणे आवश्यक आहे. यावर्षी पाऊस कमी।पडल्याने रोजगार हमी योजनेची कामे वाढवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहिरी सुरू केल्यास दुष्काळाच्या परिस्थितीत तालुक्याला याचा फायदा होईल.

*चौकट-*
सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांनी अकुशल कामाचे मस्टर काढून विहिरीचे काम सुरू करणे आवश्यक आहे. ज्या कामावर एकही रुपया खर्च झाला नाही अशी विहिरींची कामे।मंजूर झाल्यापासून सहा महिन्यात रद्द होतील. हे नुकसान टाळायचे असेल तर तात्काळ विहिरींची कामे सुरू करावी. विहीर पूर्ण झाल्यानंतर गरीब, कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती बागायती होण्यास व त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे.
*-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जामखेड.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *