*कांदा अनुदानास अपात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सभापती शरद कार्ले यांचे पणन मंत्र्यांना पत्र*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरिता सरकारने जाहीर केलेल्या अनुदानासाठी १फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर शासन निर्णयानुसार ३५० रु. प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आले होते. सदर अनुदान लाभ मिळण्याकरिता जामखेड तालुक्यातून एकूण २६८२ शेतकऱ्यांनी अर्ज बाजार समितीमध्ये दाखल केले होते परंतु अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये १११३ अर्ज कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे अपात्र ठरविण्यात आले होते, यामुळे जामखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
अनुदानापासून शेतकरी अपात्र झालेले कळताच तात्काळ बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले यांनी आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांना अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानास पात्र करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.
अपात्र शेतकऱ्यांच्या अर्जाची फेर तपासणी करून त्यांना अनुदानास पात्र करावे व अर्ज केलेला कुठलाही शेतकरी हा अनुदानापासून वंचित राहू नये अशी सभापती पै.शरद कार्ले यांनी मंत्री महोदयांना प्रमुख मागणी केली आहे.