मुंबईतील हाॅस्पीटल ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव , आमदार राम शिंदे यांच्या लक्षवेधीचा इफेक्ट

उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले आमदार प्रा.राम शिंदे व सरकारचे अभिनंदन

मुंबई : आमदार प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या एका हाॅस्पीटलच्या नामकरणाच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष वेधताच सरकारने याची तातडीने दखल घेतली आणि हाॅस्पीटल नामफलक नामकरणाचा प्रश्न सरकारने निकाली काढला. यामुळे गतीमान सरकार अन् वेगवान निर्णय याचा प्रत्यय आला. राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या वेगवान निर्णयांचा धडाका सुरू असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
मुंबई शहरातील रे रोड, माझगाव येथील न. भु. क्र. २५४ (भाग) येथील अहिल्यादेवी होळकर रुग्णालयाच्या जागेवर मे. कॅनकेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत उभारण्यात आलेल्या कर्करोग रुग्णालयाच्या दर्शनी भागावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा नावाचा उल्लेख करण्याबाबतचा निर्णय महापालिका मुख्यालयातील अध्यक्ष, स्थायी समिती दालनामध्ये दि. २३.०४.२०१८ रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. या प्रश्नांवर आमदार प्रा.राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले. त्या आधी ७ जूलै २०२३ रोजी आमदार प्रा.राम शिंदे सदर बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून निदर्शनास आणून दिली होती.

आमदार प्रा.राम शिंदे लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात उत्तर दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझगांव येथील न. भू. क्रमांक २५४ (भाग) धारण करणाऱ्या ३९६.६८ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर मे. कॅनकेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत उभारण्यात येणाऱ्या कर्करोग रुग्णालयाच्या नामकरणावेळी त्यामध्ये देवी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा उल्लेख असावा आणि तसे त्या संस्थेस कळविण्याचा निर्णय दिनांक २३ एप्रिल, २०१८ रोजी घेण्यात आला होता. तद्नंतर दिनांक ११ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या ठरावान्वये सदर भूभाग मे. कॅनकेअर ट्रस्ट यांना कर्करोग रुग्णालयाच्या विस्ताराकरिता मक्त्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, दवाखाने अशा वैद्यकीय संस्थांना नावे देण्याबाबत महानगरपालिकेच्या दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ च्या ठरावातील मार्गदर्शक तत्वांनुसार प्रस्तावित जागेवर पूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रसुतीगृहास दिलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्या नावात बदल केला जाऊ नये अशी अट संबंधित संस्थेबरोबर करण्यात येणाऱ्या मक्ता करारात समाविष्ट करण्याबाबत तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षांनी सूचना केली होती.

मे. कॅनकेअर ट्रस्ट संस्थेमार्फत महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम १९४९ अंतर्गत नर्सिंग होम नोंदणीकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त अर्जामध्ये रुग्णालयाचे नाव “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड ऍण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल” मुंबई असे नमूद करण्यात आले आहे. सदर नोंदणी झाल्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागावर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड ऍण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल” असा नामफलक लावण्याकरिता मे. कॅनकेअर ट्रस्ट या संस्थेस बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सूचित करण्यात आले आहे, असे उत्तर देण्यात आले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात उत्तर देत असताना मुंबई येथील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड ऍण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल” असा नामफलक संबंधित हाॅस्पीटलच्या इमारतीवर दर्शनी भागात लावण्यात आल्याचे फोटो सभागृहात दाखवले. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या लक्षवेधीमुळे हा निर्णय सरकारने घेतला. नामफलकाचा प्रश्न पाच वर्षांपासून रखडला होता. मात्र हा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून मुंबई येथील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड ऍण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल” च्या नामफलकाच्या नामकरणाचा प्रश्न रखडला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. त्याबरोबर लक्षवेधीद्वारे हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला होता. सरकारने तातडीने संबंधित हाॅस्पीटलवर नामफलक लावण्याचे आदेश महापालिकेला दिले. गतिमान सरकारचा अनुभव या निमित्ताने आला. हाॅस्पीटलवर नामफलक लावण्याचा निर्णय तातडीने अंमलात आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत व सरकारचे मनापासून आभार !

– आमदार प्रा राम शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *