उर्वरित ४ बंधारे बांधकामाच्या परवानगीसाठीही आमदार रोहित पवार यांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती

कर्जत प्रतिनिधी,

कर्जत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीना नदीवरती आता ६ बंधारे बांधण्यासाठी राज्य सरकारची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करुन सीना नदीवरील १० पैकी ६ बंधाऱ्यांना मंजूरी मिळवली आहे तसेच उर्वरित ४ बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव डाकू, दिघी व चौंडी यांचे देखील गेट दुरुस्ती काम प्रस्तावित असून त्याला देखील लवकरच मंजुरी मिळेल.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोहित पवार यांनी राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन सर्वेसाठी परवानगी मिळवली होती. सर्वे पूर्ण झाल्यानंतर आता १० पैकी ६ बंधाऱ्यांना मंजूरी मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आमदार रोहित पवार यांनी उर्वरीत ४ बंधाऱ्यांनाही मंजूरी द्यावी अशी विनंती केली आहे. जेणेकरून पाणी गळती थांबवता येईल.

सीना लाभक्षेत्रात असलेले रातंजन, घुमरी, नागलवाडी, नागापूर, सितपुर, तरडगाव या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेजमध्ये होणार असून याचा सीना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मार्च-एप्रिलच्या दरम्यान कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने पाणी राहत नव्हते व ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असे. परंतु, आता लातूर टाईप बॅरेज बंधारे होत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणात फायदा होणार आहे. या शिवाय 2880 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राला याचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे.

आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत देखील यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. जुन्या पद्धतीचे कोल्हापूर टाईप बॅरेज बंधाऱ्यांनी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लातूर टाईप बंधारे बांधण्यात यावेत अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन सरकारने देखील लगेच संपूर्ण महाराष्ट्रात लातूर टाईप बॅरेज करावेत असे निर्देश दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण बंधाऱ्यांच्या सर्वेसाठी परवानगी मिळवली होती. तो सर्वे पूर्ण झाल्यानंतर ते बंधारे व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे मी अनेकवेळा पाठपुरावा केला होता. तसेच अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर 10 पैकी 6 बंधार्‍यांना परवानगी मिळाली आहे. उर्वरित चार बंधाऱ्यांनाही परवानगी मिळावी जेणेकरून पाणी गळती थांबवता येईल, यासाठी मी पाठपुरावा करत आहे.

– रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड विधानसभा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *