Home जामखेड वार्ता संत वामनभाऊंच्या पालखीचे जामखेडला पहिले गोल रिंगण उत्साहात

संत वामनभाऊंच्या पालखीचे जामखेडला पहिले गोल रिंगण उत्साहात

0
3

संत वामनभाऊंच्या पालखीचे जामखेडला पहिले गोल रिंगण उत्साहात

जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गड येथे गुरुवारी (ता.16)  दुपारी तीन वाजता संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण  मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
वारकरी संप्रदायाचे मूळ उगमस्थान म्हणून गहिनीनाथ गडाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्याला विशेष मानाचे स्थान आहे.
 गडाचे मठाधिपती महंत  विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
 गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी,मातकुळी असा प्रवास करत गुरुवारी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे सकाळी दाखल झाली.
जामखेड शहरात आगमन होताच, तपनेश्वर येथे श्रीनागेश्वर भजनी मंडळाने टाळ मृदंग विना घेऊन भजन करत सामोरे जाऊन, दिंडीचे स्वागत केले.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिंडीचे स्वागत करत सहभागी  झाले.
दरम्यान शहरात ठिकठिकाणी पालखी मार्गावर सडा रांगोळी काढून महिलांनी स्वागत केले. ठिकठिकाणी वारकऱ्यांना  नागरिकांनी फळे, चहा बिस्कीट, नास्ता औषधे, पाणी व्यवस्था केली होती. शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात श्रीविठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जगदाळेवस्ती येथे पंगत झाली .
 जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या  वतीने जामखेडचे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या हस्ते
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचा सन्मान करण्यात आला व रिंगण सोहळा सुरू झाला. यावेळी आष्टीचे माजी आमदार भिमराव धोंडे तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… गहिनीनाथ महाराज की जय, संत वामनभाऊ महाराज की जय , या जयघोषात  भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. यावेळी भाविकांनी एकच जय जयकार केला.
वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले. यावेळी महंत विठ्ठल महाराज यांनी स्वतः  अभंग गायले या अभंगाच्या चालीवर वारकरी वेगवेगळे खेळ खेळले. अनेक पुरुष व महिला भक्तांनी फुगडीचा आनंद लुटला.  यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिंगण सोहळ्या दरम्यान या ठिकाणी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
जामखेड परिसरातून पंढरपूरला दररोज अनेक दिंड्या जातात. मात्र संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा हा सर्वात भव्य दिव्य सोहळा अनुभवास येतो.  जमादारवाडी येथे होणारे रिंगण हे एकमेव आहे. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. राज्यभरातून लाखो संख्येने वारकरी हे या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page