*जामखेड -सौताडा ५४८-डी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आमदार रोहित पवार यांचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र*

*नागरिकांना होत असलेल्या त्रासाची रोहित पवार यांनी दखल घेत दिली थेट नितीन गडकरींना माहिती*

जामखेड | जामखेड ते सौताडा हा राष्ट्रीय महामार्ग  जामखेड शहरातून जातो आणि सध्या या महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा दर्जा चांगला नसल्याने आणि नागरिकांना पावसात चिखल साचून होत असलेल्या त्रासामुळे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र देऊन त्यांचं याकडे लक्ष वेधलं आहे.

जामखेड ते सौताडा या एकूण १३ किमी अंतर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी देखील मंजूर झाला होता.  परंतु सध्या सुरू असलेल्या आणि काही प्रमाणात पूर्ण झालेल्या कामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बाब आमदार रोहित पवार यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रात नागरिकांना होत असलेला त्रास आणि सध्या पावसामुळे चिखल साचून तसेच सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांची होत असलेली दैना मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली. तसेच वेळोवेळी कंत्राटदारांना सांगून आणि याबाबत चर्चा करूनही शेवटी ‘जैसे थे’च परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. हे देखील रोहित पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. आता दर्जेदार आणि उत्तम पद्धतीचे काम होण्यासाठी आपण संबंधितांना निर्देशित करावे आणि हा बहुप्रतीक्षित महत्वाचा महामार्ग जो जामखेड शहरातून जातो त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल याकडे आपण लक्ष घालावे अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांना केली आहे.

*प्रतिक्रीया* – (चौकट)
सरकारकडून येणारा निधी हा योग्य पद्धतीने वापरला जाणं हे फार महत्त्वाचं असतं. पिण्याच्या पाण्याच्या लाईन असतील, रस्ते असतील अशा मतदारसंघातील विविध कामांकडे मी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालतो. आणि जेव्हा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेकवेळा नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या त्यावेळी मी त्याची पाहणी केली आणि मंत्री महोदय व अधिकाऱ्यांना याबाबतीत सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत खराब पद्धतीचं आणि काम निकृष्ट दर्जाचे काम आम्ही आमच्या मतदारसंघात होऊ देणार नाही.

– *आमदार रोहित पवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *