*जामखेड गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची श्रीनगर येथे होणाऱ्या ‘सुशासनासह पंचायत’ या विषयावरील कार्यशाळेसाठी निवड*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) येथे होणाऱ्या ‘सुशासनासह पंचायत’ या विषयावरील चार दिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. श्रीनगर येथे शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ही कार्यशाळा दि. २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.

     या कार्यशाळेसाठी ग्रामविकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे नामांकन महाराष्ट्र शासनाने केले असून त्यांना या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. सध्या देशभर शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. केंद्र  आणि राज्य शासनाच्या सर्व धोरणांचे अंतिम फलित शाश्वत विकास ध्येय साध्य करणे हेच आहे. त्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीना याबाबत प्रशिक्षण देणे, त्यांच्यामध्ये शाश्वत विकास ध्येयाबाबत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाकडून नेहमीच सुरू असतात.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्रालयाकडून ‘सुशासनासह पंचायत’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेसाठी देशभरातून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी १३ सप्टेंबर २०२१ रोजी पंचायत समितीचा कार्यभार स्वीकारल्यापासून पंचायत समितीला उत्कृष्ट प्रशासन देण्याचा प्रयत्न केला आहे. मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, स्वच्छ भारत मिशन (ओडिएफ प्लस) अशा विषयांमध्ये नाशिक विभागात अव्वल राहण्याचा मान मिळवला आहे. मनरेगाच्या माध्यमातून शाळांना वॉल कंपाउंड, गावंतर्गत रस्ते, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायत भवन अशी नाविन्यपूर्ण कामे हाती घेतली आहेत. ग्रामसेवकांच्या कामाची मूल्यमापन पद्धत तयार केली.

अपुरे मनुष्यबळ असतानाही पंचायत समिती जवळपास प्रत्येक विषयात अव्वल आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून शासनाने त्यांची श्रीनगर येथील कार्यशाळेसाठी निवड केली आहे. याबद्दल खा. सुजय विखे, आ. रोहित पवार, आ. राम शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, समर्थ शेवाळे तसेच तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार व सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *