*पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन*
*निश्चित तारखेबाबतच्या लेखी पत्राचा आमदार रोहित पवार यांचा आग्रह*
कर्जत/जामखेड – ता. २ – येत्या पावसाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे लेखी पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार रोहित पवार यांना दिले आहे. त्यामुळे या प्रश्नी त्यांनी उद्या (ता. ३ जुलै) मंत्रालयात जाहीर केलेले उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आमदार रोहित पवार हे निकराचे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी स्थापन करण्यास त्यांनी मान्यता मिळवली, मात्र पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच राज्यात सत्ताबदल झाला. त्यामुळे एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ही प्रक्रीया पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार हे सातत्याने पाठपुराव करत आहे. गेल्या हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अशा दोन्हीही अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर दोन्ही अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावून तेथे सरकारच्या मध्यस्थीने उद्योग आणले जातील, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांची अनेकदा भेट घेऊन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. परंतु राजकीय आकसापोटी मतदारसंघातील काही जणांकडून एमआयडीसीच्या प्रश्नाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावला जात नसल्याचा आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे
दरम्यान, एमआयडीसी चा विषय मार्गी लावण्यासाठी आग्रही असलेले आणि त्यासाठी प्रयत्नांची पारकाष्टा करत असलेल्या आमदार रोहित पवार यांनी अखेर दोन महिन्यांपूर्वी सरकारला निर्वाणीचा उशारा देत थेट उपोषणाचे हत्यार उपसले आणि तसे पत्र सरकारला दिले. त्यानुसार उद्या (सोमवार, ता. ३ जुलै) रोजी मतदारसंघातील नागरीक आणि तरुणांसोबत त्यांचे नियोजित उपोषण होते. परंतु तत्पूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार रोहित पवार यांना पत्र देऊन येत्या अधिवेशनात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या विनंतीला मान देत आमदार रोहित पवार यांनी त्यांचे पूर्वनियोजित उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, एमआयडीसीची अधिसूचना काढण्याबाबत मतदारसंघातील नागरिक आणि तरुणांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. तसेच तरुणांच्या रोजगाराचा प्रश्नही मोठा आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी उपोषण तूर्तास स्थगित केले असले तरी केवळ उद्योगमंत्र्यांच्या या आश्वासनाच्या पत्रावर आमदार रोहित पवार हे समाधानी नाहीत. औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून इतर अनुषंगिक बाबी नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण होतील, याबाबत तपशीलवार पत्र देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
*प्रतिक्रिया* – (चौकट)
‘‘मतदारसंघातील ‘एमआयडीसी’साठी गेल्या चार वर्षांपासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु केवळ याचे श्रेय मला मिळू नये म्हणून मतदारसंघातील काही झारीतील शुक्राचार्य राजकीय दबावतंत्राचा वापर करत अडथळा आणत आहेत. पण यामुळे मतदारसंघाचे आणि येथील तरुणांचे किती नुकसान होते, याची जाणीव त्यांना नसावी याचं आश्चर्य वाटतं. पण आता मा. उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी दिलेल्या पत्रानुसार उद्याचे उपोषण तूर्तास स्थगित करत आहे, मात्र कोणत्या तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लावला जाईल, याचं तपशीलवार पत्र देण्याची मागणीही उद्योगमंत्री महोदयांकडं केली आहे. ’’
– *आमदार रोहित पवार*
—————————–