*आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम*
*हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रोहित पवार यांनी केली होती मागणी*
कर्जत/ जामखेड | अवर्षण प्रवण भाग असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी स्वतः प्रयत्न करून शेतकऱ्यांना गावांमध्ये जाऊन मोफत पिक विमा संरक्षण उतरवून दिले. त्याचाच फायदा हा मतदारसंघातील शेतकऱ्यांना होत असताना आता पाहायला मिळत आहे.
सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांनी तूर,कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले असून प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (Mid-season Adversity) अंतर्गत अधिसूचित महसूल मंडळांमध्ये सात वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के गट अपेक्षित असावी व त्या अनुषंगाने राज्यशासन, विमा कंपनी आणि शेतकरी प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संयुक्त सर्वेक्षण करतात व त्यांच्या अहवालानुसार येणाऱ्या नुकसान भरपाई रकमेच्या २५टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे.
त्यानुसार कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्वेक्षण पूर्ण झाले होते आणि त्याबाबतचा प्रस्ताव देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. परंतु त्याला मंजुरी मिळत नव्हती. यासाठी आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सदरील प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार या मागणीला आता यश आले असून आमदार रोहित पवार यांच्या मागणीनुसार आता अधिसूचना जाहीर करून कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईच्या २५टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तसेच याचा फायदा हा आता संपूर्ण जिल्ह्याला होत असताना पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांना विनंती केल्यानंतर कर्जत व जामखेड तालुक्यात स्वतंत्रपणे मोर्चा काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक शेतकरी व मित्र पक्षांनी मिळून आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देखील दिले होते व सरकारवर दुहेरी दबाव आणला होता, त्याचेच फलितरूप म्हणून आता सरकारने नुकसान भरपाई देण्याचे अधिसूचना काढून जाहीर केले आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील कर्जत, मिरजगाव, माहीजळगाव, राशीन, भांबोरा व कोंभळी आणि जामखेड तालुक्यातील जामखेड, आरणगाव, खर्डा, नायगाव व नान्नज या महसूल मंडळांचा समावेश सदरील प्रस्तावात होता त्यानुसार आता या भागातील पिक विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना पण आर्थिक मदत मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार असल्याने आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच पद्धतीने वेळोवेळी आमदार रोहित पवार शेतकरी व मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत शासन दरबारी पाठपुरावा करत असतात. त्यातच आता शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
*प्रतिक्रिया* : (चौकट)
सध्या पावसाचा मोठा खंड पडल्याने व यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच शेतकरी हवालदिल झाला असताना त्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (Mid-season Adversity) अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेतली होती तसेच मतदारसंघातही शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि मित्र पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून आंदोलन देखील केले होते. दोन्ही तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून माझ्या मतदारसंघातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी विनंती मी मंत्री महोदयांना केली होती. या विनंतीला मान देऊन त्यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी मंत्री महोदयांचे व प्रशासनाचे आभार मानतो. याचा फायदा हा माझ्या मतदारसंघासह संपूर्ण नगर जिल्ह्याला झाला याचा आनंद आहे.
– *आमदार रोहित पवार*