*जामखेड मध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा पथदर्शी प्रकल्प*

*एकल महिलांना मिळणार मदतीचा हात*

*एकल महिलांसाठी प्रशासन आपल्या दारी उपक्रम*

जामखेड प्रतिनिधी,

समाजामध्ये एकल महिलांचा प्रश्न अधिकाधिक गंभीर बनत चाललेला आहे. विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, अविवाहित महिलांची संख्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या वर्गाला शासकीय योजनांच्या मार्फत लाभ देऊन सक्षम करता आले तर त्या कोणाच्याही आधाराविना आपले आणि आपल्या मुलाबाळांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतात. त्यांना आयुष्यात स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांनी जिल्हाभरामध्ये एकल महिलांची यादी तयार केलेली आहे. राज्यामध्ये सर्वप्रथम राबवण्यात आलेली ही संकल्पना असून त्याचे राज्य शासन व राज्य महिला आयोगाने ही कौतुक केले आहे.

यापुढे जाऊन या महिलांचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्याचे आदेश श्री येरेकर यांनी दिलेले आहेत. त्यानुसार या सर्व महिलांचे ऑनलाइन सर्वेक्षण पुढील चार दिवसांमध्ये तालुकानिहाय पार पडणार आहे. सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीनुसार या सर्व महिलांना मदतीचा एक हात देऊन जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या पदरात कसा पडेल यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.

हे सर्वेक्षण ऑनलाइन पद्धतीने ग्रामपंचायतच्या मार्फत ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी पार पाडणार असून सर्व महिलांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातूनही एखादी एकल महिला वंचित राहिली तर त्यांनी तात्काळ ग्रामपंचायतशी संपर्क साधून आपली नोंदणी मोफत करून घ्यावी.

*जामखेड तालुक्यातील सर्व एकल महिलांनी या सर्वेक्षणामध्ये आपली नोंदणी करून घ्यावी. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ग्रामसेवकांना मदत करावी. जर कुणी एकल महिला या सर्वेक्षणापासून वंचित राहिले असतील तर तात्काळ ग्रामपंचायतला संपर्क साधावा.*

*-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी जामखेड.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *