आरबीआयकडून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं आतापर्यंत जमा झालेल्या नोटांचा आढावा घेतल्यानंतर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. आरबीआयच्या नव्या घोषणेनुसार ७ ऑक्टोबरपर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून घेता येतील किंवा जमा करता येतील. याशिवाय ८ तारखेपासून आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये नोटा जमा करता येणार आहेत. आरबीआयनं १९ मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांची नोट बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत होती.

त्यामुळं आता वाढलेल्या ७ दिवसांच्या मुदतीत ज्यांच्याकडे गुलाबी नोटा असतील त्यांनी त्या बँकांमध्ये किंवा आरबीआयच्या प्रादेशिक केंद्रांत जमा कराव्यात.
आरबीआयनं १९ मे पासून बँकांमध्ये नोटा जमा करण्याची व्यवस्था केली होती. त्यासह देशभरातील आरबीआयाच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये देखील नोटा जमा करण्याची व्यवस्था केली होती.

आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार १९ मे २०२३ रोजी भारतातील चलनात २ हजार रुपयांच्या ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या, त्यापैकी २९ सप्टेंबरपर्यंत ३.४२ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा झालेल्या आहेत. आता फक्त ०.१४ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा व्हायच्या आहेत. एकूण आकडेवारी पाहिली असता १९ मे नंतर २९ सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या ९६ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.

आरबीआयनं बँकेत जमा झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या कालावधीत नोटा बँकांमध्ये जमा करता येतील. त्यानंतर म्हणजेच ८ ऑक्टोबरपासून तिथं नोटा स्वीकारणं बंद करण्यात आलेलं आहे.

८ ऑक्टोबरपासून आरबीआयच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये एखादा व्यक्ती २ हजार रुपयांच्या २० हजार रुपये रकमेच्या नोटा बदलून घेऊ शकतो. भारतीय पोस्टाद्वारे आरबीआयच्या १९ कार्यालयांकडे या नोटा पाठवता येतील. त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. यासाठी संबंधित व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या ओळखपत्रांचे पुरावे द्यावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *