गायवळ बंधूंच्या सहकार्याने सोनेगावच्या सरपंचपदी डॉ.विशाल वायकर यांची बिनविरोध निवड..
गुलालाची उधळण,तोफांची सलामी व फटाक्यांच्या आतिषबाजीने सोनेगाव मध्ये जल्लोष…
जामखेड प्रतिनिधी,
याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ प्रा. सचिन सर गायवळ या बंधूंच्या सहकार्याने दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सोनेगावच्या सरपंचपदी डॉक्टर विशाल राजेंद्र वायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व 9 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवड जाहीर होताच सोनेगाव मध्ये गुलालाची उधळण, तोफांची सलामी व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष करण्यात आला.
यावेळी बोलताना सचिन सर गायवळ म्हणाले की, डॉ. विशाल वायकर यांची सरपंचपदी निवड ही सोनेगावच्या विकासासाठी व गावातील प्रत्येक व्यक्तीच्या लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी केलेली आहे. ते स्वतः डॉ.असल्याने त्यांचा ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे ते सोनेगावच्या विकास कामात नक्कीच भर घालतील असा मला ठाम विश्वास आहे असे ते यावेळी म्हणाले.
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणारी सोनेगाव ग्रामपंचायत ही विकास कामाच्या माध्यमातून वाटचाल करीत आहे.
यापूर्वी सोनेगाव या ठिकाणी राजकीय वाद होऊन मोठा संघर्ष उफाळून आला होता, सततच्या गटबाजीमुळे सोनेगाव शहर सतत धुमसत होते परंतु गायवळ बंधूंनी ग्रामपंचायत मध्ये लक्ष घातल्याने सलग दहा वर्ष ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यास त्यांना मोठे यश आले. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सोनेगावच्या सरपंच रूपाली बिरंगळ यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे प्रशासनाने दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम घेतला होता, त्या दृष्टीने सरपंच पदासाठी प्रयत्न करण्यात आले. गायवळ बंधूंच्या सहकार्याने व प्रा.सचिन सर गायवळ समर्थक डॉ. विशाल वायकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सामाजिक माजी सरपंच रुपाली बिरंगळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सुमन मिसाळ, रुक्मिणी बिरंगळ,सुनिता बोलभट, मनीषा वायकर, विलास मिसाळ, मारुती बोलभट, अश्रू खोटे सह सोनेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोनेगावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एस.एल.नवले,तलाठी श्रीराम कुलकर्णी व ग्रामसेवक एस.एस.गदादे यांनी काम पाहिले.