जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
आ.रोहित पवारांच्या दाव्याला कार्लेंचे प्रत्युत्तर
जामखेड प्रतिनिधी :
जिल्हा बँकेची निवडणूक लढविता येणार नाही, असा दावा करून आ. रोहित पवार यांनी प्रा. राम शिंदे साहेब यांच्यावर केलेल्या टीकेला कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेडचे सभापती पै. शरद कार्ले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.तुम्ही भविष्यकार आहात का? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण उभे राहणार आणि कोण नाही, हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल त्यांनी केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केवळ प्रस्थापितांनीच उभे राहिले पाहिजे, असे काही बंधन आहे का? असा प्रश्न उपस्थित करत कार्ले म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येक पात्र व्यक्तीला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच कोण उभे राहू शकत नाही, असा दावा करणे योग्य नाही.
सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आ. रोहित पवार यांनी किती दौरे केले? असा सवालही पै. कार्ले यांनी उपस्थित केला.
कर्जमाफीच्या श्रेयावरूनही कार्ले यांनी आ. पवारांना लक्ष्य केले. महायुती सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, आंदोलनापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी जाहीर झाली होती, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे प्रत्येक निर्णयाचे श्रेय स्वतःकडे घेण्याऐवजी वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी, असे ते म्हणाले.
पवार साहेबांचे नातू म्हणून राज्यभर मिरवण्यापेक्षा कर्जत-जामखेडच्या जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या,असा टोला लगावत कार्ले म्हणाले की, प्रा. राम शिंदे साहेब यांच्याकडे राज्याची जबाबदारी असतानाही ते मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, निवडणूक कोण लढवणार आणि कोण नाही, याचा अंतिम निर्णय संबंधित निवडणूक प्रक्रिया व पात्रतेनुसारच होईल. त्यामुळे आधीच निष्कर्ष काढण्यापेक्षा जनतेसमोर आपल्या कामाचा हिशेब मांडावा, असे पै. शरद कार्ले यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही समर्थक कार्यकर्त्यांचे राजकीय दुकानदारी बंद होणार आहे ,अशी खोचक टीकाही पै. कार्ले यांनी केली.
![]()



