मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्याच्या वतीने साखळी उपोषण सुरु

जामखेड प्रतिनिधी,

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सतरा दिवस उपोषण केले होते यावेळी सरकारने तीस दिवसांची मुदत मागितली होती जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती ती चाळीस दिवसांची मुदत संपली आहे.
अद्याप आरक्षण जाहीर झाले नाही तेव्हा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सपाटी जि .जालना या ठिकाणी सभा घेऊन कोट्यावधी मराठा समाजाच्या साक्षीने शासनास 24 तारखेपर्यंत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे व मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण द्यावे अशी विनंती केली होती. उद्या 24 तारखेला ही मुदत संपत आहे. 24 तारखेला जर मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर दिनांक 25 ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राज्यात प्रत्येक तालुक्यात साखळी उपोषण केले जाणार आहे.आणि त्याप्रमाणे नियोजन म्हणून जामखेड तालुक्यातील सर्व गावे जामखेड तहसील कार्यालयासमोर दररोज एक गाव याप्रमाणे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार आहेत.

सदरील उपोषण शांततेच्या मार्गाने व कसलाही हिंसात्मक प्रकार न करता तहसील कार्यालयाची परवानगी घेऊन होणार आहे. यासाठी बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी जामखेड शहर, गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी लेहनेवाडी , शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी जांबवाडी, शनिवार 28 ऑक्टोबर रोजी सावरगाव, रविवार 29 ऑक्टोबर रोजी भुतवडा याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील गावे नियोजनाप्रमाणे दररोज येऊन जामखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत.

तरी वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जामखेड शहर व दिलेल्या गावातील मराठा बांधव दररोज तहसील कार्यालय या ठिकाणी साखळी उपोषणासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच कोणीही सदर कालावधीमध्ये हिंसात्मक प्रकार करू नये, साखळी उपोषण शांततेच्या मार्गाने करावे व कोणत्याही मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नयेत असेही आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.
आजच्या उपोषणासाठी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *