संत तुकाराम हे मराठी संस्कृतीचे मुळ पुरूष, त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला सर्व पुरस्कारांपेक्षा सर्वात जास्त महत्वाचा वाटतो : -जेष्ठ कवी इंद्रजित भालेराव

जामखेड प्रतिनिधी,
संत तुकाराम हे मराठी संस्कृतीचे मुळ पुरूष आहेत. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला आज पर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्कारांपेक्षा सर्वात जास्त महत्वाचा वाटतो. संत तुकारामांच्या गाथेत नाही असे या जगात काही नाही. जगात जे आहे ते सर्व त्यात आहे. माणसाच्या सर्व तऱ्हा तुकारामांच्या गाथेत आहेत.

त्यांच्या नावाचा पुरस्कार देण्यासाठी केलेल्या निवडीबद्दल मी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे आभार मानतो. असे प्रतिपादन जेष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
आज दि. १९ रोजी जामखेड येथील कन्या विद्यालय येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सुप्रसिद्ध जेष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांना मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेडच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संत तुकाराम साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व कन्या विद्यालयाचे शालेय समिती सदस्य सुरेश भोसले हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तर निमंत्रक म्हणून मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. या. पवार, कार्याध्यक्ष व जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, उपाध्यक्ष डॉ. विद्या काशिद, नगरसेवक मोहन पवार, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा. कुंडल राळेभात, रंगनाथ राळेभात, स्थानिक स्कुल कमीटी सदस्य प्रकाश सदाफुले डॉ. जतीनबोस काजळे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के. टी. चौधरी, नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी. के. मडके, अवधूत पवार, पर्यवेक्षक संजय हजारे, माजी मुख्याध्यापक आर. टी. साखरे, अवधूत पवार, शत्रूघ्न कदम, व्यापारी मारूती काळदाते, पारनेर बँकेचे संचालक दत्तात्रय सोले, प्रा. मोहन डुचे, शिक्षक नेते केशव कोल्हे, विनायक राऊत, ॲड. हर्षल डोके, विजय पाटील आदि मान्यवरांसह विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, जेष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांची साहित्यिक क्षेत्रातील उंची हिमालया एव्हडी आहे. इंद्रजित भालेराव यांनी आपल्या कविता व साहित्यातून ग्रामीण भागातील सर्व स्तरातील माणसांचे वास्तव मांडले. ग्रामीण भागाची नाळ, व्यथा, अडचणी, ग्रामीण भागातील माणसांचा संघर्ष याचा वृत्तांत भालेराव यांनी आपल्या साहित्यातून मांडला आहे. शालेय विद्यार्थ्यांना काव्यातून स्फुर्ती मिळावी व आपल्या पुस्तकातील कवीला ऐकता व पाहता यावे यासाठी आज हा कार्यक्रम विद्यालयात घेण्यात आला. मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेडच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संत तुकाराम साहित्य पुरस्काराचे हे पाचवे वर्षे आहे.
यापुर्वी जामखेड येथे माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या माध्यमातून व भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या संत नामदेव पुरस्काराची सुरूवातही जामखेड येथूनच झाली होती. मात्र आता हा कार्यक्रम जामखेड येथे होत नाही.
यावेळी पुढे बोलताना भालेराव म्हणाले की, मराठी साहित्य प्रतिष्ठानजामखेडच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संत तुकाराम साहित्य पुरस्कार व पुर्वी भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या संत नामदेव पुरस्कार यामुळे जामखेडचे नाव साहित्य उजाळून निघाले आहे. प्रा. आ. या. पवार यांच्यामुळे मी जामखेडला अनेक वेळा आलो. या पुरस्काराचे महत्व वेगळे आहे. संत तुकारामांच्या नावाने पुरस्कार मिळणे मी माझे भाग्य समजतो.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्कुल कमीटीचे सदस्य व जेष्ठ नेते सुरेश भोसले म्हणाले की, ग्रामीण भागात सुविधा नसतानाही मराठी साहित्य प्रतिष्ठानने सुरू केलेले कार्य खूप कौतुकास्पद आहे. आपल्या जामखेड येथील साहित्यिक प्रा. आ. य. पवार यांचेही कार्य व नाव मोठे आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून महाराष्ट्रातील अनेकांनी पी. एच. डी. मिळविलेल्या आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
पुरस्काराचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर
स्थानिक स्कुल कमीटी अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी कवी इंद्रजित भालेराव यांचा सविस्तर परिचय करून दिला. यावेळी मराठी साहित्य प्रतिष्ठान, कन्या विद्यालय, नागेश विद्यालय व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भालेराव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे शेवटी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. चौधरी यांनी आभार मानले.
जेष्ठ कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या अनेक कवीता व साहित्य इयत्ता चौथी पासून , माध्यमिक, ज्युनियर कॉलेजपर्यंतच्या अभ्यासक्रमात तसेच विद्यापीठ स्तरावर पुस्तकेही अभ्यासासाठी असून विद्यार्थ्यांना आपल्या पुस्तकात कविता असणाऱ्या कवीला प्रत्यक्ष पाहता व ऐकता आल्याचा अनुभव मुलींनी अनुभवला.
यावेळी विद्यार्थींनीमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यावेळी विद्यार्थींनी शेतकरी जीवनावर सादर केलेल्या नाटीकेने सर्वांचे मन हेलावून टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *